श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी हा चकमकीत ठार झाला आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यादरम्यान दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला.
जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकणारा दहशतवादी इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. त्या दरम्यान, शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इम्रान याचा मृत्यू झाला.
चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच परिसरात शोध मोहीम सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.