राहुरी -शहरातील भाग्यश्री हॉटेल मागे भरदिवसा लूटमार करण्यात आली. घरात एकटीच असलेल्या एका वयोवृद्ध महिलेला पायाची मालिश करून देतो, असे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल भामट्याने पळवून नेले.
सोनाली देवीदास कोकाटे या त्यांचे पती व सासू बरोबर राहुरी शहरातील भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहत आहेत. दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी सोनाली कोकाटे या त्यांच्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेल्या होत्या. त्यांच्या सासू कुसुम या घरी एकट्याच होत्या. दुपारी 12 वाजे दरम्यान एक भामटा घरात आला. तुमचे हातपाय दुखत असल्याने तुमच्या मुलाने मला पायाची मालिश करण्यासाठी पाठवले आहे. मालिश करताना तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा, अडथळा होत आहे, असे सांगितले. कुसुम यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने बाजूला काढून ठेवले. येथे मालिश करता येत नाही, आतमध्ये बेडवर बसा. तेथे मालिश करून देतो. कुसुम कोकाटे या बेडकडे जात असताना भामटा सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पळून गेला.
6 ग्रॅम वजनाचे सुमारे 15 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र व एक 8 हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल घेऊन अनोळखी भामटा पळून गेला. सोनाली कोकाटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
========