राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षांना जखडून ठेवण्याची ‘मिशन बारामती’मधून रणनीती
त्रिभूज शेळके
पारगाव – राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा गेली चाळीस ते पन्नास वर्षे केंद्र बिंदू हा बारामती लोकसभा मतदार संघ राहिला आहे. या मतदारसंघाला अनेकांनी छेद देण्याचा प्रयत्न केला परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचे महत्व किंचितही कमी झालेले नाही. पूर्वी शरद पवार व आत्ता सुप्रिया सुळे यांचे या मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. नाही म्हणायला अजित पवार यांनी एकदा नेतृत्व केले आहे. म्हणजे हा मतदारसंघ पवार घराण्याचे होमपिच आहे. आगामी लोकसभेसाठी या होमपिचवर खेळणार कोण? याकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपाने 2024च्या उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होईल किंवा कोण पराभूत होईल. परंतु राष्ट्रवादीचे शरद पवार यांना बारामतीतच जखडून ठेवण्याची रणनीती भाजपा आखत नसेल ना? अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.
अमेठीनंतर भाजपाने मिशन बारामतीचा एल्गार पुकारला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची धुरा सोपवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने बारामती लोकसभा मतदार संघासाठी चंग बांधला आहे. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन या सहा विधानसभा मतदारसंघात तीन महिन्यांनी प्रत्येकी तीन दिवस मुक्काम करून विकास कामांचा पूर्ण आढावा घेणार आहेत. यापूर्वी महादेव जानकर, कांचन कुल यांच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्याने भाजपने आपला मोर्चा बारामती मतदारसंघाकडे वळवून जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
मिशन बारामतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सोबतीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार राहुल कुल, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री विजय शिवतारे आदी दिग्गज नेते मंडळी उपस्थित असणार आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मतदारसंघावर नजर ठेवून विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बारामती मिशनचा लाभ कोणाला होणार याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे.
नेमका कोणाला फायदा होणार?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आतापर्यंत बारामतीचा गड अभेद्य राखला आहे. या गडाला आतापर्यंत अनेकांनी सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये काही जणांचे डिपॉझिट जप्त झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झंझावात, खासदार सुप्रिया सुळे यांचा तळागाळातील जनसंपर्क, अभ्यासू व संयमी नेतृत्व यामुळे भाजपच्या मिशन बारामतीतून नेमका कोणाला फायदा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.