पुणे – सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर टाच आणल्यानंतर या कारखान्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थाकडे ईडीने मोर्चा वळविला आहे. त्यानुसार ईडीने देशातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) नोटीस बजावली आहे.
जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला सुमारे 85 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावर “ईडी’ने मागील आठवड्यात कारवाई केली. राज्यातील 14 साखर कारखाने लिलावात विकले होते. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचासुध्दा समावेश होता. हा कारखाना लिलावात गुरु कमोडीटीजने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना दुसऱ्या एका कंपनीने चालवायला घेतला. त्यांना यामध्ये तोटा सहन करावा लागल्याने जरंडेश्वर शुगर्सने हा कारखाना चालवायला घेतला.
जरंडेश्वर शुगर्सवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्यांना अर्थपुरवठा कोणी केला आहे. याचा शोध ईडी घेत आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला सुध्दा नोटीअ बजावून याबाबतचा खुलासा ईडी मागविला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याला किती कर्जपुरवठा करण्यात आला. कोणत्या वर्षी कर्ज देण्यात आले. त्यासाठी तारण म्हणून मालमत्ता कोणती ठेवली. तारण मालमत्तेची किंमत किती, कर्जाची परतफेड झाली आहे की नाही. कर्जाची थकबाकी आहे का? आदी बाबींचा तपशील मागविण्यात आला आहे.
दरम्यान, ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून सहकारक्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने केली जात असल्याचा आरोपही काहींकडून होत आहे.
अध्यक्ष थोरात म्हणतात की…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले की, जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी ईडीने नोटीस दिली आहे. यामध्ये ईडीने खुलासा मागितला आहे. जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला 85 कोटींचे कर्ज दिले आहे. हे कर्ज नाबार्ड, आरबीआय आणि राज्य सहकारी बॅंकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेले आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने मागील दहा वर्षात कर्ज थकविले नाही. कर्ज नियमित वसूल होत आहे.