पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या 21 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅंकेत मोठी गर्दी झाली होती. सोमवारी दिवसभरात 187 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर आतापर्यंत 299 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, आंबेगाव तालुका “अ’ गटातून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी होऊन पात्र उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिद्ध होईल. बॅंकेच्या 21 संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक संचालक हे “अ’ मतदारसंघ तालुका प्रतिनिधी यामधून 13 संचालक निवडले जाणार आहे. तर “ब’ मतदारसंघ – 1, “क’ मतदारसंघ -1, “ड’ मतदारसंघ -1, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी -1 आदी संचालक निवडले जातील.
ऍड. सुभाष मोहिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते यांनी “क’ मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सध्याच्या बॅंकिंगमधील परिस्थितीत त्या क्षेत्रातील माहितगार माणूस सदर बॅंकेवर असणे गरजेचे आहे. या भूमिकेतून ऍड. मोहिते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बॅंकिंग क्षेत्रातील त्यांच्या माहिती व ज्ञानाबाबत विचार करून त्यांना संधी देतील, असा विश्वास ऍड. मोहिते यांनी व्यक्त केला आहे