सासवड – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्यासाठी एकूण 39 महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 1 एप्रिल पासून हे वाटप करण्यात आले असून सुमारे 47 लाख 10 हजार रुपये रोख वाटप करण्यात आले आहेत.
जिल्हा बॅंकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) मेमाणे पारगाव येथील जय योगेश्वर महिला बचत गटाला एक लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी महेंद्र खैरे यांनी दिली.
महिलांना नवीन उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाते. नगण्य व्याजदरात हे कर्ज देताना महिला बचत गटाच्या माध्यमातून ताळेबंद पाहीला जातो.
बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल देखील पाहून योग्य बचतगटांना हे कर्ज वाटप केले जाते. पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, बॅंकेचे वसुली अधिकारी किरण जाधव, सासवड शाखाधिकारी हनुमंत मचाले, बचत गटाच्या समन्वयक जयश्री शिंदे, पारगाव येथील जय योगेश्वर बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.