पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या 21पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत 27 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. 22 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी 172 जणांनी 299 अर्ज भरले होते. छाननीमध्ये 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे 159 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीस पात्र ठरले आहेत. आता 15 जागांसाठी 132 उमेदवारांचे अर्ज आहेत. “पीडीसीसी’ बॅंक ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. बॅंकेवर मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या बॅंकेवर वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री पवार हे अनेक वर्षांपासून बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत असून यंदाही ते बिनविरोध निवडून आले.
बॅंकेच्या 294 शाखा असून ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असा लौकिक आहे. तसेच खातेदार-ठेवीदार यांची संख्या सुमारे 10 लाख इतकी आहे. त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राजकारणात सक्रिय राहता येते. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचे पॅनेल जाहीर केले असून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.