पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या 21 जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर आता 16 जागांसाठी 154 उमेदवार अर्ज पात्र ठरले आहे.
दरम्यान बारामती “अ’ मतदारसंघातून सतीश काकडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिनविरोध निवडून आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि.22 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निबंधक मिलिंद सोबले यांनी बुधवारी दुपारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी 172 जणांनी 299 अर्ज भरले होते. छाननीमध्ये 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे 159 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीस पात्र ठरले आहेत. यामध्ये पीडीसीसी बॅंक ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. या बॅंकेवर मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या बॅंकेवर वर्चस्व आहे.
शताब्दी महोत्सव पूर्ण करणाऱ्या या बॅंकेच्या 294 शाखा असून ग्रामीण भागाची अर्थवाहिनी बॅंकेचा लौकिक आहे. तसेच सुमारे खातेदार-ठेवीदार यांची संख्या सुमारे 10 लाख इतकी आहे. या बॅंकेवर संचालक असलेले अनेक जण आमदार झाले आहेत. या बॅंकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात सक्रीय राहता येते. त्यामुळे बॅंकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले संचालक
“अ’ मतदारसंघ बारामती तालुका प्रतिनिधीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव तालुक्यातून दिलीप वळसे पाटील, भोरमधून आमदार संग्राम थोपटे, पुरंदरमधून आमदार संजय जगताप आणि मावळमधून ज्ञानोबा दाभाडे हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून याची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे.