जामखेड -मागील पाच महिन्यांपासून निवड प्रक्रिया रखडलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड उद्या (दि. 3) होणार होती. मात्र सभापतिपदाच्या आरक्षणात बदल करण्यात आल्याने डॉ. भगवान मुरुमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने सभापतिपदाची निवड प्रक्रिया स्थगित करण्याचा आदेश दिला. त्यामुळे हे पद पुन्हा रिक्त राहिले आहे.
चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी करीत निवडीचा कार्यक्रम घोषित केला होता. महिलेसाठी सभापतिपद आरक्षणाची घोषणा आदेशात केल्यामुळे जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या सभापतिपदाची निवडप्रक्रिया 3 जुलैचा मुहूर्तावर पार पडणार होती.
पण माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरुमकर यांनी या आरक्षणाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. सुरवातीला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण असताना अचानक कोणत्याही सदस्याला विचारात न घेता आरक्षण कसे बदलले, असा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावर खंडपीठाने सभापतिपदाच्या आरक्षणास स्थगिती दिली आहे. सभापतिपद घोषित न करण्याचा निर्णय दिला आहे. डॉ. मुरुमकर यांच्या वतीने ऍड. अभिजित मोरे यांनी काम पाहिले.
12 डिसेंबर 2019 रोजी सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित झाले. मात्र, अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने ग्रामविकास विभागाकडून तत्काळ मार्गदर्शन मागविण्यात आले.
अनेक दिवस निवडीसंदर्भात मार्गदर्शन प्रशासनास प्राप्त झाले नव्हते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जामखेड सभापती आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिलेले ग्रामविकास खात्याचे पत्र जिल्हा प्रशासनात 27 डिसेंबर 2019 रोजी प्राप्त झाले. त्यावर अनुसूचित जमाती वगळून अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.
चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. सोडतीत जामखेड पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले. मात्र, सभापतिपदासाठी निर्धारित मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर पुन्हा निवडप्रक्रिया घेण्यात आली. त्यावेळी सभापतिपदासाठी राजश्री मोरे यांचा एकमेव अर्ज आला. मात्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी दाखला नसल्याने अर्ज माघारीच्या मुदतीत मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे सभापतिपद रिक्त राहिले.
उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल करणाऱ्या मनीषा सुरवसेंची बिनविरोध निवड झाली. तेव्हापासून तब्बल पाच महिने जामखेड पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त आहे. प्रभारी सूत्रे उपसभापती मनिषा सुरवसेंकडेच आहेत.