आषाढी एकादशी : मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मंदिरांमध्ये पूजा
पिंपरी – सध्या सुरू असलेल्या “करोना’ संकटामुळे भाविकांनी घरातच हरिनामाचा गजर करत विठुरायाच्या चरणी आपला भक्तिभाव अर्पण केला. आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये अगदी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आले. भाविकांना कोणत्याही मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर मंदिर परिसर बंद करण्यात आला. नागरिकांनी घरातच पूजा-अर्चना आणि आषाढी एकादशीचा उपवास केला.
आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम असतो. पिंपरी – एच. ए. कॉलनी येथे सकाळची न्याहरी होते. तर, परतीच्या प्रवासात पालखीचा पिंपरीगावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम असतो. त्यामुळे आषाढी एकादशीला जेव्हा पालखी पंढरपूरला पोहचते त्या दिवशी ज्यांना पालखीसोबत पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही ते भाविक मंदिरांमध्ये जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीला आकुर्डी, पिंपरी-एच.ए.कॉलनी आणि पिंपरीगाव येथील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
पर्यायाने, आज संबंधित मंदिरांमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाले. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात गोपाळ कुटे, बेबीताई कुटे, गिरीश कुटे, गुलाब कुटे यांच्या हस्ते आज पहाटे अभिषेक, पूजा, काकडा आरती आदी कार्यक्रम झाले. एच.ए.कॉलनी येथील विठ्ठल मंदिरात दिलीप कोंडे, भगवानराव पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. मंदिरात गणेश पूजन, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. पुजारी योगेश वाघरूळकर, संदीप जगताप, शिवप्रसाद करमरकर आदी उपस्थित होते.
मंदिर परिसरात सोशल डिस्टंसिंग ठेवून धार्मिक कार्यक्रम झाले. सर्वांनी मास्क घातले होते. त्यानंतर मंदिर परिसर बंद करण्यात आला. पिंपरीगावातील विठ्ठल मंदिरात महापूजा, काकडाआरती आदी कार्यक्रम झाले. निखिल कुदळे यांनी सपत्नीक पूजा केली. संतोष कुदळे, रामभाऊ कुदळे आणि ट्रस्टचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.