जकार्ता – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज “आसियान’चे सरचिटणीस डॉ. काओ किम हुर्न यांची इंडोनेशियामध्ये भेट घेतली आणि भारत आणि “आसियान’मध्ये वित्तपुरवठा, सायबर आणि सागरी क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर चर्चेचा प्रस्ताव ठेवला.
यावेळी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीबाबत देखील चर्चा झाली. उर्जा, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्याच्या मुद्यांवर देखील चर्चा झाली. भारत आणि “आसियान’दरम्यान ट्रॅक-2 संलग्नेचा विस्तार करण्याबाबत एकमत झाल्याचे जयशंकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जयशंकर यांनी मलेशियाचे परराष्ट्र मंत्री डॉ. झांबरी अब्दुल कादिर यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा केली. “आसियान’शी संबंधित विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आजपासून 6 दिवसांसाठी इंडोनेशिया आणि थायलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत.
इंडोनेशियामध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या “आसियान’च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते थायलंडमध्ये होणाऱ्या “आसियान रिजनल फोरम’च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी थायलंडला जाणार आहेत.