महापौरांच्या उपस्थितीत पालिका अधिकारी, सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
पिंपरी – वाकड आणि पिंपळे निलख भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना जाणवणारी पाणी समस्या आणि विजेच्या प्रश्नासंदर्भात महापौर माई ढोरे यांनी रविवारी (दि. 1) सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांची वाकडमध्ये संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सोसायट्यांचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. येत्या दहा महिन्यांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
वाकड येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, महावितरण मुख्य अभियंता सचिन तालेवार, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे सुदेश राजे, सचिन लोंढे यांच्यासह वाकड आणि पिंपळे निलखमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी समस्येबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. सोसायट्यांना कधीच नियमित आणि उच्च दाबाने पुरेसे पाणी मिळत नसल्याचे सांगितले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे टॅंकरने पाणी आणावे लागते. त्याचा फायदा उठवून टॅंकर माफिया टॅंकरमागे तब्बल 750 रुपये आकारतात. हे टॅंकरमाफिया सोसायट्यांची आर्थिक लूट करत आहेत. ही आर्थिक लूट असह्य झाली आहे. पाणीगळतीमुळे सर्वांना समान पाणी देता येत नसल्याचे महापालिका कित्येक वर्षांपासून सांगत आहे. परंतु, ही पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, अशी नाराजी सोसायट्याचा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सोसायट्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.
त्यानंतर महापौर माई ढोरे यांनी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांना धारेवर धरले. कर भरणाऱ्या प्रत्येकाला पाणी देणे महापालिकेला बंधनकारक आहे. नागरिकांचा आक्रोश तुम्हाला ऐकायला येत नाही का?, सोसायट्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी का उपाययोजना केली जात नाही?, असा सवाल केला.
टॅंकरमाफियांना शहरातून हद्दपार करण्यासाठी विहिरी व इतर नैसर्गिक स्त्रोत ताब्यात घेऊन ते पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी केल्या. या बैठकीत सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायट्यांमधील महावितरणचे डीपी, उघडे असणाऱ्या विजेच्या तारा, वारंवार जाणारी वीज यांमुळेही नागरिक त्रस्त असल्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्याचे लक्ष वेधले. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महावितरणने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी उघडे डीपी, विजेच्या तारा झाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिले.
दहा महिन्यांत पाणीपुरवठा सुरळीत करू
सहशहर अभियंता रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांनी वाकड व पिंपळेनिलख भागातील सोसायट्यांचा पाणीपुरवठा येत्या दहा महिन्यांत सुरळीत होईल, असे सांगितले. त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कामांची माहिती दिली. तसेच सोसायट्यांच्या दहा प्रतिनिधींचा समावेश असलेल्या टिमसोबत सतत संपर्क आणि सुसंवाद ठेवून पाणीप्रश्नांवर मात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.