घाऊक बाजारात प्रतिकिलो 80 रुपये भाव
पुणे – मार्केट यार्डात तुर्कस्तानच्या कांद्याची आवक रविवारी झाली. यापूर्वी इजिप्तच्या कांद्याचीही आवक झाली होती. मात्र, त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. तुर्कस्तानचा कांदा दर्जेदार असून, त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दिली. या कांद्यास घाऊक बाजारात किलोस 80 रुपये भाव मिळाला.
याबाबत कांद्याचे व्यापारी रितेश पोमण म्हणाले, “रविवारी मुंबई मार्केटवरुन पुण्यात चार कंटेनर कांद्याची आवक झाली. प्रत्येक कंटेनरमध्ये 25 ते 30 टन कांदा होता. दाखल झालेल्या चार कंटेनरपैकी दोन ते तीन कंटेनरची विक्री झाली.
परदेशातून आयात केलेल्या कांद्यापैकी अफगाणिस्तानचा कांदा दर्जेदार आहे. त्यासही चांगली मागणी आहे. तुर्कस्तानचा कांदा महाराष्ट्रातील जुन्या कांद्याप्रमाणे दिसणारा आहे. लांबलेल्या पावसामुळे कांद्याच्या नव्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जुना कांदाही आता संपत आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून कांद्याची आवक करण्यात येत आहे. बाजारात रविवारी जुन्या कांद्याची 10 ते 15 ट्रक इतकी आवक झाली. जुन्या कांद्यास प्रतिदहा किलोस 600 ते 900 रुपये भाव मिळाला आहे. दरम्यान, नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरू झाला असून, नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड आणि श्रींगोदा परिसरातून आवक होत आहे.
रविवारी हळवी कांद्याची 35 ते 40 ट्रक इतकी आवक झाली. नवीन कांद्याच्या आवकेपैकी अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. उच्च प्रतीच्या हळवी कांद्याला चांगली मागणी आहे तसेच लहान कांद्याचे प्रमाण जास्त आहे. नव्या कांद्यास सध्या प्रतीदहा किलोस 400 ते 650 रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे.