पुणे – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत टेक महिंद्रा, व्हेरीटास या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून पहिला विजय मिळवला.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत शुभम दिघे (७९ धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने पबमॅटिक संघावर १६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टेक महिंद्रा संघाने २० षटकात ५ बाद २२७ धावा केल्या.
यात स्वप्निल सावगावे ५६, शुभम दिघे ७९, सय्यद पटेल नाबाद ३७, इशान ठाकूर १६, सचिन गिलबिले १४ यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात पबमॅटिक संघाचा डाव १३.३ षटकात सर्वबाद ६७ धावांवर कोसळला. यात अझहर मुल्ला १३, ज्ञान रौनक ११ यांनी थोडासा प्रतिकार केला.
टेक महिंद्राकडून विकास भाकरे (३-८), सचिन गिलबिले (२-१३), अमितोश निखार (१-४), विनीत पाठक (१-७) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात प्रणव पवार (६५ धावा व ३-१७) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरीटास संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा ४९ धावांनी पराभव केला.