मुंबई – बीसीसीआय व निवड समिती कीतीही कौतुक करत असली तरीही नवोदित फलंदाज सूर्यकुमार यादव याने केवळ टी-20 क्रिकेटच खेळावे, त्याची एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची पात्रता निश्चितच नाही, असे परखड मत इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक नासीर हुसेन याने व्यक्त केले आहे.
मधल्या फळीतील फलंदाजाची खूप मोठी जबाबदारी असते. त्याला एक तर डाव सावरता आला पाहीजे तसेच त्याबरोबर धावांची गतीही राखता आली पाहीजे. सूर्यकुमारला कर्णधारपदावर बसवले गेल्यावरही त्याच्या आततायी खेळावर बंधन आले नाही याचाच अर्थ त्याला अद्याप एकदिवसीय क्रिकेट समजलेलेच नाही, असेही हुसेन म्हणाले.
दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी आयसीसीने इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये नासिर हुसेनला आगामी वर्षात (2024) सर्वाधिक यश मिळवणाऱ्या संभाव्य क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आले आहे, येथे हुसैन त्याच्या उत्तरात दोन फलंदाजांची नावे घेताना दिसत आहे. नासिर हुसेनने विराट कोहलीला आपल्या पसंतीत प्रथम ठेवले आहे आणि बाबर आझम हा त्याचा दुसरा पर्याय आहे.
नासिर हुसेन सांगतो की, ‘माझी पहिली पसंती एक मेगास्टार आहे आणि यात शंका नाही. तो म्हणजे विराट कोहली. 2023 हे वर्ष त्याच्यासाठी अप्रतिम ठरले आणि विश्वचषकही अप्रतिम ठरला. एकापाठोपाठ एक अशा अनेक विक्रमी खेळी करताना तो किती चांगली फलंदाजी करतोय यावर लक्ष द्यायला आपण विसरलो. तांत्रिकदृष्ट्या, मी विराट कोहलीची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही. त्याची मानसिक स्थिती चांगली असून त्याचा खेळ अतिशय व्यवस्थित दिसतो.
नासिर हुसेन म्हणतो, ‘पुढे तोच आहे ज्याची तुलना नेहमीच विराटशी केली जाते. बाबर आझम. मला वाटते की हे वर्ष त्याच्यासाठी आणि पाकिस्तान संघासाठी खूप मोठे असणार आहे. त्याने कर्णधारपद सोडले आहे, याचा अर्थ त्याच्या खांद्यावरून मोठे ओझे हटले आहे. आता तो पाकिस्तानसाठी खूप धावा करू शकतो. त्याच्या बॅटमधून धावा निघणे पाकिस्तानसाठी खूप गरजेचे आहे. कॅरेबियनमध्ये टी-20 विश्वचषक आहे. गेल्या वेळीही पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला होता. आता त्यांना त्यांच्या माजी कर्णधाराच्या खऱ्या कामगिरीची गरज असेल.