मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी थोडीफार खरेदी होऊन निर्देशांक कालच्या तुलनेत माफक प्रमाणात वाढले. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या जास्त पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होताना दिसत नाहीत.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 126 अंकांनी वाढून 61,294 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 35 अंकांनी वाढून 18,232 अंकावर बंद झाला. आज झालेल्या खरेदीचा फायदा ऍक्सिस बॅंक, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टेक महिंद्रा, इंडसइंड बॅंक, विप्रो, नेस्ले, बजाज फायनान्स या कंपन्यांना झाला. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
चीन आणि हॉंगकॉंगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. तर दक्षिण कोरियातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. सोमवारी अमेरिकेच्या शेअर बाजार बंद होता.