नवी दिल्ली – लेबेनानमधील हिज्बुल्लाह या दहशतवादी गटाविरोधातही कारवाई करण्याचा इशारा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी आज दिला. हमासबरोबर तात्पुरत्या युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच इस्रायलने हा इशारा दिला आहे.
हिज्बुल्लाहने इस्रायलबरोबर युद्धाची घोषणा न करताच हल्ले करणे सुरू ठेवले आहे. गाझातील युद्ध सुरू झाल्यापासूनच हिज्बुल्लाहचे हे हल्ले सुरू आहेत. ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने कारवाई सुरू केल्यादिवसापासूनच हिज्बुल्लाहचे हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे इस्रायल-लेबेनान सीमेजवळील शेकडो गावांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
जर इस्रायलने गाझामध्ये युद्धबंदी केली, तरच इस्रायलवर दररोज केले जाणारे हल्ल थांबवले जातील, असे हिज्बुल्लाहने म्हटले आहे. मात्र गाझामधील युद्धविराम गाझाच्या उत्तर भागासाठीही लागू होईल, असा जर कोणी विचार करत असेल, तर ते चुकीचे आहे, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गोलांट यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर गाझातील हल्ले सुरू राहतील. उत्तरेतील हे आक्रमण आमचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सुरू राहिल, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे इस्रायलने लेबेनानमधून होणार्या हल्ल्यांना प्रत्युत्तराचे हल्ले सुरू केले आहेत. गेल्या ५ महिन्यात इस्रायलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाहचे २००दहशतवादी आणि ३५ सामान्य नागरिक मारले गेले आहेत.