Israel-Hamas war : इस्रायल आणि गाझादरम्यान युद्धविराम संपला असून पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलने कालपासून पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. युद्धविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर अमेरिकेचे सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी आज यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून हे युद्ध पुन्हा का सुरू झाले आणि त्याला कोण जबाबदार आहे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
दुबई विमानतळावर अँटोनी ब्लिंकन माध्यमांशी बोलताना म्हणाले, “इस्रायल-हमास शस्त्रविराम संपण्याला हमास जबाबदार आहे. हमासने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. युद्धविराम काळात जेरुसलेम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि रॉकेट हल्लेही झाले.”असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, युद्ध पुन्हा सुरू होणे विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अधिकारी व्होल्कर टर्क यांनी व्यक्त केली आहे. गाझामधील परिस्थिती संकटापेक्षाही अधिक भयंकर आहे कारण पुन्हा युद्ध सुरू झाल्यामुळे आणखी पॅलेस्टिनींचा मारले जाण्याची किंवा जबरदस्तीने विस्थापित होण्याचा धोका आहे असे टर्क म्हणाले.
हमासने युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने केला. तर अधिक ओलिसांची सुटका करण्याचा आपला प्रस्ताव इस्रायलने नाकारला असे उत्तर हमासकडून देण्यात आले. दरम्यान, इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केल्याबद्दल कतारने खेद व्यक्त केला आणि पुन्हा शस्त्रविराम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कतारच्या मध्यस्थीने आणि इजिप्त व अमेरिकेच्या समन्वयाने गेल्या आठवडय़ात शस्त्रविरामावर सहमती होण्यावर यश मिळाले होते.अजूनही २,८०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कोणत्याही आरोपाविना इस्रायलच्या ताब्यात आहेत असा आरोप इस्रायलमधील मानवाधिकार संघटनेने केला आहे.