इस्लामपूर -निगडी (ता. शिराळा) आणि कराड तालुक्यात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात पुन्हा तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 27 ते बुधवार, दि. 29 एप्रिल या काळात शहरातील पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक मुख्याधिकारी प्रमिला माने यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी शिराळा तालुक्यातील निगडी येथील एका युवतीला मिरज येथील रुग्णालयात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी संबंधित युवती व तिच्या कुटुंबियांनी इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. इस्लामपूरातील त्या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाणार आहे. त्यांना मिरज येथे हलवण्यात आले आहे. शिवाय दक्षता आणि खबरदारीचा भाग म्हणून तीन दिवस शहर पूर्ण लॉकडाऊन केले जाणार आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, करोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. शहरात सध्या रुग्ण आढळले नसले तरी आपण धोक्याच्या पातळीवर आहोत. नागरिकांनी याचे गांभीर्य समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. करोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. नागरिकांनी शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले, बाहेरून येणाऱ्या संसर्गाच्या सर्व शक्यता विचारात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून शहरात येणाऱ्यांनी विनाकारण येऊ नये आणि लोकांनीही घराबाहेर पडू नये. नियम व कायद्याचे उल्लंघन झाल्यास पोलीस कोणतीही गय करणार नाहीत.
“ते’ रुग्णालय सील
निगडी येथील करोनाबधित युवती इस्लामपुरात ज्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कुटुंबियांच्यासमवेत आली होती. तेथील संपूर्ण माहिती घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाने ते रुग्णालय सील केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले.