इस्लामपूर (विनोद मोहिते) – इस्लामपूर (जि. सांगली) येथे मृत झालेल्या महिलेवर ती जिवंत असल्याचे सांगून तिच्यावर दोन दिवस उपचार केल्याचे भासवून जादा बिल उकळणार्या “त्या” डॉक्टरला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आधार हेल्थ केअरच्या डॉ. योगेश वाठारकर याने पैशांच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी बुधवारी रात्री डॉक्टराच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर डॉ. वाठारकरला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली होती. आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी महिला रुग्णांचा मुलगा सलीम हमीद शेख (कासेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
ही दुर्दैवी घटना मार्च महिन्यातील आहे. २४ फेब्रुवारीला सलीम शेख यांच्या आई सायरा हमीद शेख यांना आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्रथमदर्शनी ब्रेन पॅरालिसेस असल्याचे वाठारकर याने सांगितले होते. त्यानंतर किडनीचा त्रास सुरू झाला. नंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार केले.
या दरम्यान ८ मार्चला सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर पुढे दोन दिवस १० मार्चपर्यंत योगेश वाठारकर याने मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. तशी बनावट कागदपत्रे बनवून हॉस्पिटलच्या जादा बिलाची आकारणी शेख यांच्याकडून करण्यात आली. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या पेन्शनसाठी आईचा मृत्यू दाखला इस्लामपूर पालिकेकडून घेण्यात आला. त्यावर शेख यांचा मृत्यू ८ मार्चला झाल्याची नोंद आहे, तर हॉस्पिटलची बिले १० मार्चपर्यंत आकारण्यात आली आहेत.
या प्रकाराची रुग्णालय प्रशासन व पालिकेकडे चौकशी केली असता डॉ. वाठारकर याने रुग्णाचा मृत्यू होऊनही दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची तक्रार इस्लामपूर पोलिस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी प्रकरण सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याकडे पाठवून यावर अभिप्राय मागितला.त्या अहवालानुसार इस्लामपूर पोलिसांनी डॉ. योगेश वाठारकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.
यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना ही आधार हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण दाखल करून घेतले नसल्याने याच डॉकटर वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. कोरोना रुग्ण उपचारासाठी आधार हॉस्पिटल हे अधिग्रहित केले होते, मात्र कोरोनाचे उपचार करण्यास नकार देत कोरोना हॉस्पिटल सुरू केले नाही, म्हणून गुन्हा दाखल झाला होता.
सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांचा अहवाल अन् डॉक्टरावर कारवाई…!
डॉ. योगेश वाठारकर याने सायरा हमीद शेख यांच्याबाबत सादर केलेल्या कागदपत्रे व मृत्यूच्या तारखेमध्ये एकसूत्रता नसल्याचा अभिप्राय सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांनी दिला आहे. रुग्ण ८ मार्चला सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी मृत झाल्या असूनही त्यांच्या मृतदेहावर दोन दिवस पुढे उपचार केले. ४१ हजार २८९ रुपये जादा बिल आकारल्याचे दिसून आले. त्या अहवालानुसार इस्लामपूर पोलिसांनी कारवाई केली.
‘गब्बर इज बॅक’ ची इस्लामपूरात चर्चा
डॉ. वाठारकर याच्या या कृतीने ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटाची चर्चा इस्लामपूरात सुरु झाली आहे. हा प्रकार शहराच्या वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणारा ठरला आहे. चित्रपटातील कथानकात समाजात घडत असलेल्या घटनाच प्रतिबिब उमटत असत. गब्बर फिल्म सारखा प्रकार इस्लामपूर मध्ये घडला आहे. याबाबत सोशल मीडियावर “गब्बर इज बॅक” ची चर्चा आहे.पैश्याच्या हव्यासापोटी, चक्क मृतदेहवरच उपचार करणाऱ्या डॉ. योगेश वाठारकर वर पोलिसांनी कारवाई केली.