मुंबई – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. विस्ताराबरोबरच व्यापक फेरबदल झाल्याने मोदी सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. विस्तारावेळी तब्बल 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट तर भागवत कराड, कपिल पाटील व भारती पवार यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला.
दरम्यान, प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. गतवर्षी राज्यसभेवर स्थान देण्यात आलेल्या भागवत कराड यांना वर्षभरातच मंत्रिपदाची लॉटरी लागली. मात्र मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचं बोललं जातंय.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी एकाही नवनिर्वाचित मंत्र्याचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर न टाकल्याने या चर्चांना चांगलीच हवा मिळाली आहे.
अशातच आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराज असल्याचा चर्चांवर भाष्य केलं आहे.
“अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल” असं दरेकर म्हणाले.
पंकजा मुंडेंचे ट्विट
बुधवारी दिल्ली येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे दिल्लीत असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी, प्रीतम मुंडे या मुंबई येथील निवासस्थानी असल्याचं सांगत हे वृत्त खोटं असल्याचं म्हंटलं.