मुंबई – प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राच्या वाट्याला १ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री अशी ४ मंत्रिपद आली आहेत. नारायण राणे यांचा देखील मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी, नारायण राणे यांची उंची दिलेल्या मंत्रालयापेक्षा मोठी असल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता.
राऊत यांच्या या वक्तव्यावर नारायण राणे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
“संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असतं. चांगलं नाही वाईटच बोलायचं असतं. संजय राऊत यांना सांगेन खातं बरं वाईट नसतं, तर काम कसं करतो हे महत्वाचं असतं. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खातं चांगलं आणि मोठं होतं असं म्हणतील,” असं म्हणत राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर, “नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” अशी टिपणी केली होती.