मुंबई – एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. याबाबतची माहिती वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले आहे. 14 ऑगस्ट रोजी ट्विटर अकाऊंट तयार करून त्याद्वारे वानखेडे यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना सांगितले की, सोशल मीडियावरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहे. ज्या खात्याद्वारे तक्रार देण्यात आली होती ते खाते 14 ऑगस्ट रोजीच तयार करण्यात आले होते. अमन नावाच्या व्यक्तीकडून मिळालेल्या मेसेजमध्ये त्याने लिहिले की, “तुम्ही काय केले हे तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला हिशोब द्यावा लागेल.” आयआरएस अधिकारी वानखेडे यांनी सांगितले की, त्यानंतर त्या व्यक्तीने ‘तुला संपवू’ असे लिहिले आहे.
सोशल मीडियावरून धमक्या आल्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी समीर वानखेडे याचा जबाब नोंदवला होता. यानंतर आता गोरेगाव पोलिसात एफआयआर नोंदवला आहे.