शाळेचे मैदान आहे, की जंगल?

औंधच्या इंदिरा गांधी शाळा मैदानाची दुरवस्था : लॉकडाऊन काळापासून पालिकेचे दुर्लक्ष


अनास्थेमुळे लाखो रुपयांचा खर्च “माती’त 

– अभिराज भडकवाड 

औंध – औंध गावठाणातील इंदिरा गांधी प्रशालेच्या मैदानाकडे महापालिका प्रशासाने दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या हिरव्यागार मैदानाला सध्या अवकळा आली असून, अक्षरश: जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींसाठी परिसरात हे एकमेव मैदान आहे. पण, या दुरवस्थेमुळे प्रशासनाविरुद्ध नाराजी पसरली आहे. 

करोना आणि लॉकडाऊन काळात हे मैदानदेखील बंद आहे. त्यामुळे येथे आपसुकच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सध्या येथे सर्वत्र पाच फुटांपर्यंत उंच गवत, जंगली वनस्पती वाढल्या आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून कीटक वाढले आहेत. शिवाय दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.

काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून हे मैदान विकसित करण्यात आले होते. त्यावेळेस पॅव्हेलियन सुधारत आणि मैदानावर लाल माती टाकून ते व्यवस्थित करण्यात आले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता, हा खर्च “मातीत’ गेला आहे. हे मैदान सुरू असताना परिसरातील खेळाडू तसेच व्यायामासाठी ज्येष्ठ नागरिक येतात. त्यामुळे मैदानाची तातडीने दुरुस्ती करून ते खुले करावे, अशी मागणी होत आहे.

आम्ही लहानपणापासून या मैदानावर नियमित खेळत आहोत. आमच्या शारीरिक तंदुरुस्तीत या मैदानाचा मोठा वाटा आहे. आज या मैदानाची झालेली दुरवस्था दुर्दैवी आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करून मैदान आम्हाला उपलब्ध करून द्यावे. साथीच्या आजारांमध्ये व्यायाम करून तंदुरुस्त राहणे गरजेचे असते; परंतु मैदानच बंद केल्यामुळे व्यायामासाठी देखील जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हे मैदान पूर्ववत करून ते खुले करावे.
– सुशील लोणकर, स्थानिक खेळाडू, औंध गावठाण.


इंदिरा गांधी शाळेच्या मैदानावरील वाढलेले गवत काढण्याचा आणि ते मैदान परत पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु पावसाचा अडथळा येत असल्यामुळे कामास विलंब होत आहे. तरीही, लवकरात लवकर मैदान पूर्ववत करण्यात येईल. पालिकेच्या आदेशानंतर ते खुले करण्यात येईल.
– जयदीप पवार, सहायक आयुक्‍त, औंध क्षेत्रीय कार्यालय.

Leave A Reply

Your email address will not be published.