#IPL2020 : राजस्थानविरुद्ध आज चेन्नईचे पारडे जड

शारजा : – ऑस्ट्रेलियाचा भरात असलेला फलंदाज स्टिव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी देणारा धूर्त महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आजची लढत होत आहे. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत करताना धोनीने जबरदस्त माइंड गेम केला होता. त्यामुळे आता त्याचा प्रत्युत्तर कसे द्यायचे हा प्रश्‍न स्मिथच्या संघासमोर निर्माण झाला आहे. 

आजचा सामना – राजस्थान विरूध्द चेन्नई

सामन्याची वेळ :- सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ठिकाण :- शारजा
थेट प्रक्षेपण :- स्टार स्पोर्टसवर

फलंदाजी व गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर दोन्ही संघ समतोल आहेत. दोघांकडेही वादळी खेळी करणारे आक्रमक फलंदाज आहेत तसेच भरात असलेल्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची गुणवत्ता असणारे गोलंदाजही आहेत. पण नेतृत्वाच्याबाबत पाहिले तर धोनीमुळे चेन्नई संघाचा आजच्या सामन्यात दबदबा राहणार याची शक्‍यता जास्त वाटते. 

स्मिथने एक फलंदाज म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध केली असली तरीही त्याच्याकडे एक हुशार कर्णधार म्हणून कधीही पाहिले गेलेले नाही. त्यातच त्याच्या फॉर्मबाबतही सध्या चिंता व्यक्‍त केली जात आहे. इंग्लंडमध्ये सराव करत असताना त्याला चेंडू लागला होता, त्यातून पूर्ण तंदुरुस्त ठरला असला तरीही चेन्नईचा फिरकी मारा कसा थोपवायचा यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

रॉबिन उथप्पा, डेव्हिड मिलर, जोस बटलर, संजू सॅमसन, मनन व्होरा, कार्तिक त्यागी अशी चांगली संघबांधणी आहे. मात्र, स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात विजेतेपद मिळविणारा राजस्थानचा संघ त्यानंतर एकदाही विजेतेपद मिळविण्यात यशस्वी ठरलेला नाही. याउलट धोनीच्या संघाने तीन वेळा विजेतेपद पटकावले असून पहिल्यापासून धोनीच कर्णधार आहे. त्यामुळे याही सामन्यात चेन्नईचेच वर्चस्व राहणार असेच चित्र आहे.

वेगवान गोलंदाजांवरच मदार 

दोन्ही संघांत अत्यंत अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज असले तरीही या मैदानावरील खेळपट्टीचा इतिहास पाहता वेगवान गोलंदाजांवरच दोन्ही संघांची मदार राहणार आहे. राजस्थानकडे जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट व वरुण ऍरन हे गोलंदाज आहेत. मात्र, त्यातील आर्चर वगळता बाकी गोलंदाजांना कितपत यश मिळेल याबाबत शंका आहे. मात्र, दुसरीकडे दीपक चहर, लुगी एन्जीडी व सॅम कुरेन यांच्यासारखे अव्वल दर्जाचे गोलंदाज असल्याने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चेन्नईचेच पारडे जड राहणार आहे.

विलगीकरणामुळे निऱाश होतो – धोनी

करोनाचा धोका जगभरात पसरल्यानंतर भारतातही लॉकडाऊन लावले गेले होते. त्यावेळी कुटुंबासह मनसोक्‍त वेळ व्यतित केला होता. त्यानंतर आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी अमिरातीत दाखल झाल्यावर विलगीकरणात राहावे लागले. हा काळ खूपच निराशाजनक होता. त्यावेळी आपण या निराशावादी मानसिकतेतून बाहेर येणार का, असा प्रश्‍न पडला होता, अशा शब्दांत महेंद्रसिंग धोनीने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.