करोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मागणी वाढली
मंचर (पुणे) – करोनाच्या पार्श्वभूमीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करण्यास सांगितले असल्याने चिकन, मटणला मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम चिकनच्या बाजारभावात वाढ होऊन किरकोळ विक्रेते चिकन प्रतिकिलो 180 ते 190 रुपये बाजारभावाप्रमाणे ग्राहकांना विकत असल्याचे आंबेगाव तालुक्यातील चिकन विक्रेत्यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी चिकन-मटणला फारसा उठाव नव्हता. गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी 120 रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या 180 ते 190 रुपये किलो दराने मिळत आहे, अशी माहिती चिकन व्यवसायिक इसाक शेख,इम्रान मोमीन, जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून मांसाहार करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे चिकन, मटण खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे. किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयांची वाढ झाल्याने स्वस्त दराने मिळणारे ब्रॉयलर कोंबडीचे चिकन भाव खाऊ लागले आहे. मटणाचा दर सध्या 560 ते 600 रुपयांच्या दरम्यान आहे. चिकनचे दर असेच वाढत राहिल्यास 200 रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता घाऊक बाजारात वर्तविण्यात येत आहे.
- नागरिकांमधील गैरसमज झाले दूर
चिकन-अंड्यांमुळे करोना होतो, अशा आशयाच्या अफवा सुरुवातीच्या काळात पसरल्या होत्या. चीनमध्ये यामुळेच करोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला अशाही बातम्या येत होत्या. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर झाला होता. त्या दरम्यान बाजारभाव नसल्याने पोल्टी व्यवसायिकांनी कोंबड्यांची पिल्ले गाडून टाकली होती, तसेच काही पोल्टी चालक व कंपन्यांनी 100 रुपयांना 3 ते 4 कोंबड्या आठवडे बाजारात जाऊन विकत होते. मात्र, आता याबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर झाले असून, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या गोष्टी पूरका ठरत असल्याने चिकन आणि अंडी यांचे बाजारभाव थोड्या फार प्रमाणात वाढल्याने शेतकरी व पोल्ट्रीचालक समाधानी आहेत.