Indian Premier League Auction 2024 Mitchell Starc and Pat Cummins : फेब्रुवारी 2008 मध्ये पहिल्यांदा जेव्हा IPL लिलाव झाला तेव्हा प्रत्येक फ्रँचायझीला प्रत्येकी 20 कोटी रुपये पगाराची मर्यादा होती. पण यावेळी फक्त दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणजे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी मिळून संपूर्ण संघाच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली. काल रात्री दुबईत झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सने 2023 च्या लिलावात 20.5 कोटी रुपये घेत सॅम कुरनचा 18.5 कोटी रुपयांचा विक्रम मोडला.
पण पुढील 40 मिनिटांमध्येच त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकले, ज्याला कोलकाता नाइट रायडर्सने विक्रमी 24 कोटी 75 लाख रुपये देऊन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवले. स्टार्कने आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले असताना, हैदराबादने पॅट कमिन्सवर जोरदार बोली लावून आपला नवा कर्णधार निवडला असावा. स्टार्क आणि पॅट कमिन्सला एक चेंडू आणि एका षटकासाठी फ्रँचायझी किती पैसे देणार आहे त जाणून घेऊया….
प्रत्येक चेंडूची किंमत असेल लाखो रूपये…
जर एखाद्या गोलंदाजाने लीगचे सर्व 14 सामने खेळताना चार षटकांचा कोटा पूर्ण केला, तर एकूण टाकलेल्या चेंडूंची संख्या 336 होणार आहे. त्यानुसार मिचेल स्टार्कच्या एका चेंडूची किंमत KKR संघाला 7 लाख 40 हजार पडेल तर पॅट कमिन्सच्या एका चेंडूची किंमत हैदराबादला 6 लाख 10 हजार पडेल. म्हणजेच स्टार्क एका षटकासाठी 44.4 लाख रुपये आणि कमिन्स एका षटकासाठी 36.6 लाख रुपये आकारेल.
स्टार्क आणि कमिन्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असे गृहीत धरले तर या स्थितीत त्यांना क्वालिफायर आणि एलिमिनेटरसह आणखी तीन सामने मिळतील. अशाप्रकारे, 17 सामने आणि एकूण 408 चेंडूंसाठी, स्टार्कची एक चेंडू फेकण्यासाठी 6 लाख 10 हजार रुपये आणि कमिन्सची एक चेंडू फेकण्याची फी 5 लाख रुपये असेल.
एकूण 2 अब्ज, 30 कोटी, 45 लाख रुपये खर्च….
दरम्यान, काल झालेल्या लिलावात सहभागी झालेल्या सर्व 10 संघांनी मिळून एकूण 72 खेळाडूंची खरेदी केली, ज्यात 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या कालावधीत एकूण 2 अब्ज, 30 कोटी, 45 लाख रुपये खर्च करण्यात आले. लिलावात वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. अनेक दिग्गज फिरकीपटू विकले गेले नाहीत किंवा अत्यंत कमी किमतीत विकले गेले.
लिलावाच्या आदल्या रात्री आयपीएलच्या नियमांमध्ये केलेले मोठे बदल हे पेसर्सवर पैसे खर्च करण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. वास्तविक, आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन यांनी सर्व फ्रँचायझींना सांगितले होते की, नवीन हंगामात एक गोलंदाज आता दोन बाऊन्सर टाकू शकतो. याआधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच, फक्त एक चेंडू खांद्याच्या वर ठेवण्याची परवानगी होती.