Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा सीझन सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आली आहे, वास्तविक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ऋषभ पंतला तंदुरुस्त घोषित केले आहे. आता ऋषभ पंत मैदानावर खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंत आयपीएल 2023 च्या मोसमात खेळू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात चाहत्यांच्या नजरा ऋषभ पंतकडे असतील. पण याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवरही जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. मिचेल स्टार्क तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे.
मिचेल स्टार्कवर असतील चाहत्यांच्या नजरा…
अलीकडेच आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये खर्च करून मिचेल स्टार्कला करारबद्ध केले होते. अशाप्रकारे मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण 9 वर्षांनंतर तो या स्पर्धेत आपली छाप सोडू शकेल का? वास्तविक, मिचेल स्टार्क शेवटचा आयपीएल 2015 हंगामात खेळला होता, त्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. यानंतर मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळला नाही. पण आता मिचेल स्टार्क 9 वर्षांनंतर या लीगमध्ये पुनरागमन करत आहे.
ऋषभ पंत आणि स्टार्कची आयपीएल कारकीर्द…
मिचेल स्टार्कच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 7.17 च्या इकॉनॉमी आणि 20.38 च्या सरासरीने 34 फलंदाजांना त्याने बळी बनवले आहे. नवीन चेंडूशिवाय डेथ ओव्हर्समध्ये मिचेल स्टार्क हा फलंदाजांसाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे केकेआरला या वेगवान गोलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील.
ऋषभ पंतने आयपीएलचे 98 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 147.97 च्या स्ट्राइक रेट आणि 34.61 च्या सरासरीने 2 हजार 838 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतची सर्वोत्तम धावसंख्या 128 धावा आहे. याशिवाय या यष्टीरक्षक फलंदाजाने 1 शतकाव्यतिरिक्त 15 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.