पी.चिदंबरम यांच्यासह 14 जणांच्या नावाचा समावेश
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास विभागाने (सीबीआय) शुक्रवारी दिल्लीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्र माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह 14 जणांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, येत्या सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.
सीबीआयच्या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह 14 जणांच्या नावाचा यात समावेश आहे. यापैकी पी. चिदंबरम याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. गुरुवारी न्यायालयाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती. 21 ऑगस्ट रोजी त्यांना अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिने ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत.
पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांची देखील या आरोपपत्रात नावे आहेत. माजी पती-पत्नी असलेले हे दोघे सध्या मुंबईच्या ऑर्थरोड आणि भायखाळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हायप्रोफाईल हत्याकांड प्रकरणात सीबीआय कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. आयएनएक्स मीडियाचे ते दोघेही संचालक होते. दोघांवर या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाला मंजूरी दिल्याचा आरोप आहे.