मला संपवण्याचा कट रचल्यानेच तक्रार; जीवाच्या भीतीने दोन वर्षे शांत – युवराज ढमाले
पुणे – ‘भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी मला संपवायचा कट रचल्यानेच मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामागे कोणतेही राजकीय षङयंत्र किंवा व्यावहारिक वाद नाहीत,’ असे बांधकाम व्यावसायिक तथा संजय काकडे यांचे मेहुणे युवराज ढमाले यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. तसेच, “संजय काकडे यांच्या मागील तीन वर्षांच्या फोन कॉल्सची पडताळणी सीबीआयमार्फत करावी,’ अशी मागणीही ढमाले यांनी केली आहे.
ढमाले यांनी संजय काकडे आणि उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर “राजकीय षङयंत्रातून गुन्हा दाखल केला आहे,’ असा पलटवार काकडे यांनी केला. तसेच याप्रकरणी 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही जाहीर केले. या पार्श्वभूमीवर ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले.
‘माझ्या प्रगतीबद्दल बहिणीच्या मनात इर्षा’
‘मागील दहा ते बारा वर्षांत मी व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रगती केली. मी नावारूपाला येत असल्याचे लक्षात येताच माझ्या बहिणीच्या मनात प्रथम माझ्याबद्दल इर्षा निर्माण झाली. यानंतर दाजी संजय काकडेदेखील माझ्या प्रगतीवर जळू लागले. ते दोघे वैयक्तिक पातळीवर कोणालाही मोठे होऊ देत नाहीत. मी त्यांच्या दारातच राहावे, अशी त्यांची भूमिका होती. दरम्यान, मी दोन एकर जागेत बंगला बांधला. त्यांचा बंगला मात्र 24 गुंठेत जागेत आहे. यामुळे माझ्याबद्दल त्यांची इर्षा अजून वाढत गेली. त्यांनी 2018 साली मला दाबण्याचा प्रयत्न सुरू केला. मी प्रथम त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर त्यांनी मला जीवे मारू, गोळ्या घालू, अपघातात मारू अशा धमक्या दिल्या. यामुळे जीवाच्या भीतीने मी दोन वर्षे शांत बसलो होतो. मात्र, आता मला खात्रीशीररित्या संपवायचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मी तक्रार दिली. यासंबंधी मी तीन ते चार महिन्यांपूर्वीच तक्रार अर्ज दिला होता. याचा तपास केल्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हा गुन्हा अचानक एका दिवसात दाखल झालेला नाही,’ असे ढमाले यांनी यावेळी सांगितले.
राजकीय षङयंत्रातून गुन्हा दाखल : काकडे
– युवराज ढमाले यांना तीन वर्षांत दोनदा भेटलो.
– गुन्हा दाखल करण्यापूर्वी मला विचारणे अपेक्षित होते.
– पोलिसांनी कोणतीच कल्पना न देताच गुन्हा दाखल केला.
– यातून त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट आहे.
– याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
– त्यातून सत्य परिस्थिती समोर येईल.