सातारा – करोना संकटाने अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना याची मोठी झळ बसली असून करोना नियंत्रणासाठी सरकारच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या प्रयत्नातून बनवडी (ता. कोरेगाव) येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी “अर्सेनिकम अल्बम 30′ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आ. शिंदे बोलत होते. यावेळी मंगेश धुमाळ, सरपंच बाळू नलगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. रुपाली जाधव, शकिला पटेल, निलेश जगदाळे, संदीप भोसले आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे कोरेगाव तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी आहे. बनवडीत बाधित रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरु नये. ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असे आ. शिंदे यांनी सांगितले.
उत्तर कोरेगावमधील काही गावात बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आवश्यक या उपाययोजना राबवल्या, असे सांगून श्री. मंगेश धुमाळ यांनी कंटेनमेंट झोनमधील दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने दूध उत्पादकांच्या अडचणी काही प्रमाणात कमी करण्यात यश आल्याचा दावा केला.