नवी दिल्ली -केंद्र सरकारने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफ) 6 कोटींहून अधिक खातेधारकांना खुषखबर दिली आहे. त्यांना ईपीएफवर 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के इतके व्याज मिळणार आहे. त्याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी दिली.
आधीच्या वर्षासाठी ईपीएफवर 8.55 टक्के इतके व्याज मिळत होते. व्याजदर वाढीच्या प्रस्तावावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने असहमती दर्शवली नाही. त्यामुळे जादा व्याज देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर नव्या व्याजदराविषयीची अधिसूचना जारी केली जाईल. ईपीएफवरील 8.55 टक्के व्याज पाच वर्षांतील सर्वांत कमी होते.