पुणे – किंग्ज् स्पोर्ट्स करंडक अजिंक्यपद आंतरक्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्रतिक शेटे याच्या खेळीच्या जोरावर गॅलक्सी ड्रिमर्स क्लबने 30 यार्ड्स क्रिकेट अकादमीचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना 30 यार्ड्स क्रिकेट अकादमीने 18.2 षटकात 131 धावा केल्या. जीवन एम. (27 धावा), हितेन पटेल (18 धावा) व सुरज नरके (15 धावा) यांनी दोन अंकी धावा केल्या. गॅलक्सी संघाने 47 अवांतर धावा दिल्याने 131 धावांचे आव्हान उभे राहिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना गॅलक्सी ड्रिमर्स क्लबच्या प्रतिक शेटे याने नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याला प्रतिक बक्षी (39 धावा) आणि कौशल तिवारी (नाबाद 17 धावा) यांनी उत्तम साथ दिली. दुसऱ्या गड्यासाठी बक्षी व शेटे या दोघांनी 78 धावांची भागीदारी करून गॅलक्सी संघाला विजय मिळवून दिला.