पुणे -पाथ-वे फाउंडेशन आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स अकादमीने अँबिशियस अकादमीचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. केडन्सच्या भेदक माऱ्यापुढे अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा डाव 27 षटकात 132 धावावर कोसळला. संकेत फराटे (68 धावा) व वैभव विभुते (नाबाद 21) यांनी दहाव्या गड्यासाठी 81 चेंडूत 89 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
132 धावांचे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 22.3 षटकात 4 बाद 134 धावा करून पूर्ण केले. यात ऋषिकेश मोटकर (51 धावा) व हर्षल काटे (नाबाद 26) यांनी पाचव्या गड्यासाठी 85 चेंडूत 82 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी इझान सय्यद ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे सचिव रियाज बागवान आणि दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूना क्लबचे शशांक हळबे आणि दिनयार पटेल आदी उपस्थित होते.