पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पंजाबी विद्यापीठ पतियाळा संघांनी चुरशीचे विजय मिळवून येथे सुरू असलेल्या एसएनबीपी 28 व्या नेहरु अखिल भारतीय विद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
पिंपरीत नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने एकतर्फी लढतीत बनारस हिंदु विद्यापीठ संघाचा 10-0 असा पराभव केला. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाबी विद्यापीठ संघाला मात्र एसआरएम विद्यापीठ संघाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. त्यांनी 4-3 असा निसटता विजय मिळविला.
पंजाबी विद्यापीठाचे 2 सामन्यात 6 गुण झाले असून, पुणे विद्यापीठाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. त्यांनी सी गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या गटातून एसआरएम विद्यापीठ (3 गुण), बनारस हिंदु विद्यापीठ संघ (शून्य गुण) यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले.
स्पर्धेच्या बाद फेरी प्रवेशासाठी पुणे विद्यापीठ संघाला विजय आवश्यक होता. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तालेब शाह याने पाच गोल नोंदवून विजयात महत्वाचा वाटा उचलला. कर्णधाराला साजेसा खेळ करताना त्याने 17, 26, 35, 42 आणि 49 व्या मिनिटाला गोल केले. त्याला प्रज्वल मोहरकर याने तीन गोल करून सुरेख साथ केली. त्यांच्या खेळाने पूर्व विभागातून चौथ्या स्थानाने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या बनारस विद्यापीठ संघाला निष्प्रभ केले.
गुरफान शेख आणि करण दुर्गा यांनी अनुक्रमे 54 आणि 56व्या मिनिटाला गोल करून संघाचा मोठा विजय साकार केला. ड गटात अजूनही बाद फेरी पात्रतेचे चित्र स्पष्ट नाही. गतविजेते एमजी काशी विद्यापीठ आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला, तर बंगळूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर 2-1 असा विजय मिळविला.