बेंगळुरू – फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही बाबतीत सरस कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी पराभव केला व दोन कसोटी सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकत पाहुण्यांना व्हाइटवॉश दिला. श्रीलंकेच्या दीमुथ करुणारत्नेची शतकी तर कुशल मेंडीसची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या दोन सत्रातच भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावात गुंडाळला. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने 4 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने 3 आणि अक्सर पटेलने 2 गडी बाद केले.
– केवळ तीन दिवसांत भारताचा विजय
– 2-0 अशा विजयासह श्रीलंकेला व्हाइटवॉश
– सलग 15 मालिका जिंकण्याचा विक्रम
– रोहितच्या नेतृत्वातील पहिलाच कसोटी मालिका विजय
– द्रविडच्या प्रशिक्षणात भारताची क्रमवारीत झेप
– अश्विनचे 440 कसोटी बळी
– सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत आठवा
– जागतिक कसोटी स्पर्धेत 12 गुणांची कमाई
– करुणारत्नेचे शतक व मेंडीसचे अर्धशतक ठरले व्यर्थ
भारताने दुसऱ्या कसेटीवर पहिल्याच डावात पकड घेतली होती. पहिल्या डावा 252 धावा केल्यावर भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर संपवला व मोठी आघाडी घेतली. त्यानंतर आपला दुसरा डाव 303 धावांवर घोषित करत श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात दिवसअखेर 1 बाद 28 धावा केल्या होत्या.
सोमवारी खेळ सुरू झाल्यावर भारताच्या गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. करुणारत्नेने आपल्या 107 धावांच्या खेळीत 174 चैंडूंचा सामना करत 15 चौकार फटकावले. कुशळ मेंडीसने 60 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून राहता आले नाही व त्यांना या सामन्यासह मालिकाही गमवावी लागली. भारताकडून दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर सामन्याचा मानकरी ठरला तर, या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मालिकेचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 252 धावा. श्रीलंका पहिला डाव – 109 धावा. भारत दुसरा डाव – 9 बाद 303 धावा घोषित. श्रीलंका दुसरा डाव – 59.3 षटकात सर्वबाद 208 धावा. (दीमुथ करुणारत्ने 107, कुशल मेंडीस 54, रवीचंद्रन अश्विन 4-55, जसप्रीत बुमराह 3-23, अक्सर पटेल 2-37, रवींद्र जडेजा 1-48)