निगडी पोलिसांची कामगिरी
पिंपरी – नाकाबंदीत पोलिसांनी अडविल्यानंतर आपण गुप्तचर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याची अधिक चौकशी केली असता तो तोतया पोलीस अधिकारी असल्याचे समोर आले. निगडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रतिक सुनिल भावसार (वय 25, रा. विशालनगर वाकड) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आकुर्डी स्टेशन येथे निगडी पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी एमएच-12- एमएस-3035 या दुचाकीवरून आरोपी भावसार हा आला. त्याने मास्क घातले नसल्याने सोपान चत्रभुज बोधवड या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी याने आपण दिल्लीच्या गुप्तचर विभागाचा अधिकारी आहे, असे सांगितले.
यामुळे बोधवड यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र आम्हाला आमची ओळख दाखविण्यास मनाई असल्याचे आरोपी भावसार याने सांगितले. मग पोलिसांनी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लाऊन खात्री करून द्या, असे सांगितले. मात्र आपण सुट्टीवर असून फोन केल्यास आपल्यावर कारवाई होईल, असेही त्याने सांगितले. यामुळे भावसार हा तोतया असल्याची शंका आली.
पोलीस कर्मचारी बोधवड यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना दिली. जवादवाड यांनी सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनावणे आणि उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांना याबाबतची खात्री करण्यासाठी पाठविले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी भावसार याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने बनावट ओळखपत्र तयार केले असून तो गुप्तचर विभागाचा तोतया पोलीस अधिकारी असल्याचे समोर आले. त्यामुळे भावसार याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, स्वाती खेडकर, उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, सहायक उपनिरीक्षक नामदेव गाडे, कर्मचारी मराडे, सोपान बोधवड, बेबले, केकाण, होनमाने, अमोल सांळुखे, होमगार्ड बिराजदार, आरुडे यांनी केली आहे.