मुंबई – करोना लसीचे साइड इफेक्ट असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून चांगल्याच रंगल्या आहेत. यातच परदेशात काही लोकांचा मृत्यूही झाल्याचा दावा करण्यात आला. अशातच अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणेने सांगितले होते. ही बातमी ताजी असतानाच अस्त्राझेनेका ही लस पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहे. पण, ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे.
याबाबत डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सविस्तर माहिती दिली आहे की, लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यापूर्वी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा करोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे.
दरम्यान, ऑक्सफर्डने चाचणी सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही शंका नाही, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लसीचे डोस दिल्यानंतर दुष्परिणाम दिसले होते. त्यानंतर जगभरात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. लसीच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा चाचण्या सुरु झाल्या. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.