नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांना पुढील वर्षी ३१ जानेवारीपर्यंत त्यांचे स्थावर मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना एक लेखी निवेदन जारी करून हे निर्देश दिले आहेत.
या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने ही विवरणपत्रे सादर करायची आहेत. २०२३ साठी स्थावर मालमत्तेचे रिटर्न ऑनलाइन भरल्यानंतर, जारी केलेले डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून विवरण पत्र प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
अन्य कोणत्याही स्वरूपात दाखल केलेले स्थावर मालमत्ता विवरणपत्र स्वीकारले जाणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यात विलंब झाला तर नंतर माफीची विनंती गृहमंत्रालयाकडून स्वीकारली जाणार नाही. असे विवरणपत्र सादर न केल्यास संबंधीत अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.