AUS vs PAK 1st Test : पर्थ कसोटीत दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देणारी पाकिस्तानी फलंदाजी तिसऱ्या दिवशी पूर्णपणे ढेपाळली. आज (16 डिसेंबर) पाकिस्तानचा संघ पहिल्या दोन सत्राच्या आतच ऑलआऊट झाला. पाक संघाने पहिल्या डावात 271 धावा केल्या. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 216 धावांची मोठी आघाडी मिळाली.
मात्र, येथे कांगारू संघाने पाकिस्तानला फॉलोऑन दिला नाही. ऑस्ट्रेलियाने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन गडी गमावून आणखी 84 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी आता 300 धावांची झाली आहे.
Stumps on Day Three 🏏
Australia extend their lead to 300 runs after Khurram Shahzad’s double-blow.#AUSvPAK pic.twitter.com/UiTJgqSDZc
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 16, 2023
इमाम-उल-हकशिवाय इतर फलंदाज अपयशी..
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने कालच्या धावसंख्येच्या (132/2) पुढे खेळण्यास सुरुवात केली. खुर्रम शहजाद (7) पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर धावफलकावर केवळ एक धाव जमा झाली. येथून कालचा सेट फलंदाज इमाम उल हकसह बाबर आझमने डाव पुढे नेला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 48 धावांची भागीदारी झाली. पाक संघाची धावसंख्या 181 असताना बाबर (21) मिचेल मार्शचा बळी ठरला. त्यानंतर इमाम उल हक (62) देखील माघारी परतला. नॅथन लिऑनने त्याला आपल्या फिरकीत अडकवले.
192 धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि ठराविक अंतराने विकेट पडू लागल्या. सरफराज अहमद (3), सौद शकील (28), फईम अश्रफ (9), आमेर जमाल (10) आणि शाहीन आफ्रिदी (4) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. इथे सलमान आगा संघाचे एक टोक सांभाळत होता. 76 चेंडूत 28 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तीन, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. इतर गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
खराब सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला…
पहिल्या डावाच्या आधारे 216 धावांची आघाडी मिळविल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर (0) बाद झाला तेव्हा धावफलकावर एकही धाव आली नव्हती. काही वेळाने मार्नस लॅबुशेन (25) हाही तबूंत परतला. अशाप्रकारे कांगारू संघाने एकूण 40 धावांत 2 गडी गमावले होते. येथून स्टीव्ह स्मिथने (43) उस्मान ख्वाजाला (34) साथ दिली आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट पडू दिली नाही. आता हे दोन्ही फलंदाज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेतील.