नवी दिल्ली – राजौरी जिल्ह्यातील थन्नमंडीच्या धारा मक्कल पीर भागात शोध मोहिमेदरम्यान लष्कराने नैसर्गिक गुहेत उभे केलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने तेथून चार रिमोट इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी), सहा यूबीजीएल ग्रेनेड, पाच डिटोनेटर,चार फ्यूज आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. राजोरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
ठोस आणि खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर लष्कराने थन्नमंडीच्या धारा मक्कल पीर भागात शोध मोहीम सुरू केली. यावेळी नैसर्गिक गुहेत लष्कराने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. लष्कराने आयईडी आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी सकाळी हे साहित्य नष्ट केले गेले.
दहशतवादी जंगलातील अशा नैसर्गिक गुहांमध्ये लपून बसतात आणि सुरक्षा दलांवर हल्ला करतात. यामध्ये अनेकदा सुरक्षा दलांना नुकसान सहन करावे लागते. थन्नामंडीच्या जंगलातही दहशतवादी असू शकतात, ज्यांच्या अटकेसाठी लष्कराची नाकाबंदी सुरू आहे.
गेल्या महिन्यातच राजोरीच्या सोळकी गावातील बाजीमल भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते, त्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले होते. तेथेही दोन्ही दहशतवादी एका नैसर्गिक गुहेत लपले होते.