वाघोली -अत्यावश्यक सेवेच्या दूध वाहतुकीचे लेबल लावून गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो लोणीकंद पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मांजरी खुर्द येथील पुलावर शनिवारी (दि. 11) संध्याकाळी सहाच्या सुमारास पकडण्यात आला.
टेम्पोमध्ये गावठी दारूचे 36 मोकळे व 1 भरलेले असे एकूण 37 कॅन सापडले आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी टेम्पो जप्त करून कारवाई केली आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे मांजरी खुर्द येथील पुलावर लोणीकंद पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली होती. नाका बंदीमध्ये पोलीस कर्मचारी प्रफुल्ल सुतार, पोलीस मित्र कल्पेश थोरात, समीर उंद्रे, शिवाजी हजारे, पत्रकार नाथाभाऊ उंद्रे, अशोक आव्हाळे व तरुण येणाऱ्या गाड्यांची कसून चौकशी करीत होते.
मांजरी बुद्रुक येथून मांजरी खुर्दच्या दिशेने येत आलेल्या एका टेम्पोवर दूध वाहतुकीचे लेबल लावलेले दिसले. टेम्पो अडवून तपासणी केली असता आतमध्ये गावठी दारूचे 36 मोकळे तर 1 भरलेले कॅन दिसले.
कात्रज येथून आला होता टेम्पो
दुधाच्या नावाखाली गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो कात्रज येथून आला होता. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असताना एकाही चेकनाक्यावर शहर पोलिसांनी टेम्पो तपासला कसा नाही. दुधाच्या नावाखाली गावठी दारूची वाहतूक करण्यासाठी टेम्पो चालकाचे धाडस कसे झाले ? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.