पोलिसांकडून छापा : 13 जणांवर गुन्हा; चौघे ताब्यात
शिक्रापूर -सर्वत्र लॉकडाऊन असतानाही काही महाभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर काही महाभागांनी थेट कासारी जिल्हा परिषद शाळेत जुगाराचा अड्डा तयार केला. मात्र, या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 13 जणांवर गुन्हा दाखल करीत चौघांना ताब्यात घेतले आहे. तसेच या महाभागांनी तोंडाला मास्क किंवा रुमालही बांधला नसल्याने तोही गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
उमेश अशोक रासकर, सागर दीपक भुजबळ, नवनाथ लहानू काळकुटे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अतुल चंद्रकांत साबळे, प्रशांत जयसिंग सातपुते, अनिल सुदाम गोसावी, प्रदीप सुदाम गोसावी, सुनील वसंत गोसावी, काळूराम सीताराम काळकुटे, गुंडाराम सोपान सातपुते, शांताराम उर्फ लाला अशोक काकडे, अजित सुरेश साबळे, महादेव जयसिंग सातपुते (सर्व रा. कासारी ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, कासारी येथील जिल्हा परिषद शाळेत संचारबंदी असताना देखील अनेक युवक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली त्यांनतर त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, हेमंत इनामे, अविनाश पठारे यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे काही युवक गर्दी करून तोंडावर मास्क न लावता पैसे टाकून पत्ते खेळत असल्याचे दिसून आले.
त्यांना पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे काही युवक पळून गेले. तर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पत्त्यांचे दोन बंडल, तीन मोबाइल, रोख 1200 रुपये जप्त केले आहे. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शाळांवर लक्ष देण्याची गरज…
सध्या सर्वत्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले असून शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात शाळा तळीराम व जुगाराचे अड्डे बनत आह, त्यामुळे संचारबंदीत व लॉकडाऊनमध्ये शाळांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.