नवी दिल्ली : सोशल मीडिया वापरणारे जगभरात लाखो युजर्स आहेत. दरम्यान, या लाखो युजर्सना सोशल मीडिया बंद पडून नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्यातच आता इन्स्टाग्रामची सेवा काही काळ ठप्प झाली होती. परंतु या मागचे कारण अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही.विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याची घटना घडली आहे.
सध्या या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी मात्र ट्विटरवर मीम्सचा धुमाकूळ घातला आहे. Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 56 टक्के इन्स्टाग्राम युजर्सना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर 23 टक्के युजर्सना लॉग इन करण्यात काही तांत्रिक समस्या येत होत्या. आतापर्यंत 21 टक्के युजर्सनी इन्स्टाग्रामकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे या तक्रारींची दखल कंपनीकडून घेतली जाते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
महिन्याभरात इन्स्टाग्रामची दुसऱ्यांदा सेवा ठप्प झाल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी मात्र इन्स्टाग्रामकडे तक्रारींची सुरुवात केली आहे. याआधी 21 मे रोजी इस्टाग्रामची सेवा ठप्प होती. काही तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प झाल्याचं त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले होते.
इन्स्टाग्रामच्या ठप्प सेवेमुळे जगभरातील जवळपास 1,80,000 युजर्सना फटका बसला होता. यामुळे अमेरिकेत जवळपास 1 लाख नागरिक, तर कॅनडामधील 24,000 हजार युजर्सना या अडचणीमुळे त्रास झाला होता. तसेच युनाईटेड किंगडममध्ये 56,000 युजर्सना या तांत्रिक अडचणीची समस्या निर्माण झाली होती.