मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केवळ संजय राऊतच नाही तर त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना देखील अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी या सर्व प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“मला धमक्या आजच आलेल्या नाहीत. या आधी देखील मी देवेंद्र फडणवीसांना धमक्या आल्याबाबत पुराव्यांसह चारवेळा कळवलं आहे” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले,”ठाण्यात कोण कुठे माझ्यावर हल्ला करण्याचं कारस्थान करत आहे, गुंडांच्या टोळ्या वापरून माझ्यावर कसा हल्ला करावा याच्या योजना ठाण्यात आखल्या जात आहेत. हे मी पुराव्यांसह कळवलं आहे. मात्र, ठाण्यात त्याच गुंडाला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला.
फोनवरून मिळाली होती धमकी
संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना कॉल करत अज्ञाताने तुम्हा दोघांनाही मारून टाकू अशी धमकी दिली होती. सुनील राऊत यांनी याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांना दिले आहे. सकाळचा भोंगा बंद करा.महिन्याभरात ही बडबड बंद झाली पाहिजे नाहीतर गोळ्या घालीन अशी अज्ञात व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. संजय राऊत यांच्यासह सुनील राऊत यांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणाची सर्व माहिती देखील सुपूर्त केली असल्याचे समजते.