विनोद मोहिते
महाराष्ट्रातील पहिल्याच प्रदर्शनाचे इस्लामपूर येथे आयोजन
कलारसिकांना अनोखी संधी
थ्री डी आर्ट पोस्टर स्टुडिओ मोठ्या शहरात असतात. मोठी रक्कम खर्च करून ते रसिकांना पहावे लागतात. पण प्रदर्शनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील रसिकांना ही संधी मिळाली आहे. तसेच तुम्ही स्वतः त्या चित्रात सहभागी होऊन फोटोग्राफ घेऊ शकता. सध्याच्या अँड्रॉइड मोबाइल जमान्याची असणारी आवड लक्षात घेऊन ही चित्र संकल्पना साकारलेली आहे.
इस्लामपूर – देश-विदेशात सुप्रसिद्ध असणारे थ्रीडी आर्ट स्टुडिओ प्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच थ्रीडी पोस्टर प्रदर्शन इस्लामपूरात सुरु आहे. एक जगप्रसिद्ध व वेगळी संकल्पना साकारून भरविण्यात आलेले हे प्रदर्शन सर्वसामान्य कलारसिकांना पर्वणीच ठरत आहे. युवा चित्रकार गणेश पोतदार व कला शिक्षक संतोष ढेरे यांनी ही चित्रे कॅनव्हासवर रेखाटली आहेत. या चित्रांसोबत मोबाईलवर छबी टिपण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. जरा हटके फोटो घेत ते सोशल मीडियावर व्हायरलही केले जात आहेत.
येथील संभु-आप्पा उरुसाच्या निमित्ताने येथील उरण परिसरातील अंबाबाई मंदिरात हे आर्टव्हिला पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवार दि. 23 नोव्हेंबर अखेर दुपारी चार ते रात्री बारा पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. सेल्फी काढणारे माकड, पक्षी, पेंग्विन पक्षी, वाघ, संभाजी महाराजांच्या हातातून तलवार घेताना रसिकांना फोटो घेता येतील अशी थ्री डी चित्रांची रचना करण्यात आली आहे.
प्रदर्शनाच्या संकल्पनेबाबत कलाशिक्षक संतोष ढेरे म्हणाले, जगप्रसिद्ध व हटके असणारी संकल्पना आपल्या परीसरात साकारून सर्वसामान्य लोकांना कलेबद्दलची आवड, कलादृष्टिकोन दृढ व्हावा, या उद्देशाने हे प्रदर्शन साकारले आहे.
थ्री डी आर्ट पोस्टर प्रदर्शन व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीमंत छत्रपती ढोल-ताशा पथक, इस्लामपूर यांनी स्वीकारली आहे. कलारसिक डी. आर. सलगर, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शामराव वाटेगावकर, प्राचार्य प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
संभू-आप्पा ऊरसात खरेदी, मनोरंजनाची नेहमीच संधी असते. पण यंदा युवा चित्रकार गणेश पोतदार व कला शिक्षक संतोष ढेरे यांनी वेगळ्या प्रकारे थ्रीडी चित्रे रेखाटून कला रसिकांना भुरळ घातली आहे. आम्ही सहकुटुंब हे प्रदर्शन पाहिले असून ते मुलांना प्रेरणादायी असे आहे.
सरोजनी गुजर, इस्लामपूर