बढतीचा आनंद कमी; त्रास जास्त

पगार मिळणेही बंद : बदली झालेले 17 अधिकारी अडीच महिन्यानंतर कार्यमुक्‍त
पिंपरी (प्रतिनिधी) – अडीच महिन्यांपूर्वी शहरातील 17 पोलीस उपनिरीक्षकांना बढती मिळून ते सहाय्यक निरीक्षक झाले. या बढतीचा आनंद कमी आणि त्रास जास्त असाच काहीसा प्रकार या अधिकाऱ्यांबाबत घडला. या अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून नवीन ठिकाणी रूजू होण्यासाठी सोडण्यात आले नव्हते. यामुळे बढती मिळूनही त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरच काम करावे लात होते. त्यातील काहीजण पुणे पोलिसांच्या आस्थापनेवर असल्याने पुणे पोलिसांनी त्यांना कार्यमुक्‍त केल्याचे पोलीस मुख्यालयास लेखी कळविले होते. यामुळे प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या या उपनिरीक्षकांचे पगार देखील मिळणे बंद झाले होते. यामुळे कर्जाचे हप्ते कसे द्यायचे व घर कसे चालवायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अखेर गुरुवारी त्यांना कार्यमुक्‍त करीत असल्याचे आदेश उपायुक्‍तांनी दिले.

राज्यातील एक हजार 558 पोलीस उपनिरीक्षकांना 30 ऑगस्ट 2019 रोजी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातून काढण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्‍त करण्यात आले नव्हते. बढतीच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्यादा अधिकाराबरोबर वेतनवाढ, अन्य भत्ते आणि सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला मनुष्य बळाची सर्वात मोठी अडचण आहे. त्यात ऐन सणासुदीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले होते. बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्‍त करणे सोयीचे नसल्याने थांबवून ठेवण्यात आले. दरम्यान गणेशोत्सव, मोहरम, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळी, अयोध्या निकाल या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. आपल्या परिसरातची खडान्‌खडा माहिती असल्याने या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले नव्हते. यापुढील काळात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी निवास आणि पाल्यांच्या शिक्षणाची देखील सोय करायची असल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते.
म्हणून थांबले पगार
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयाने 14 ऑगस्ट रोजी काही अधिकाऱ्यांच्या पुणे शहरात बदल्या केल्या. त्यातील 32 पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत राहिले. त्यामध्ये एक निरीक्षक, 23 सहाय्यक निरीक्षक तर आठ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे पोलीस आयुक्‍तालयाने पोलीस महासंचालकांना 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असल्याचे पत्र पाठविले. यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यातील वाद समोर आला. आता पुणे पोलीस आयुक्तालयाने अनधिकृत ठरविलेल्या अन पिंपरी-चिंचवडमध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आल्याचे लेखी कळविल्यामुळे त्यांचे पगार बंद
झाले होते.

“”मागील काही दिवसांपासून बंदोबस्त सुरु होता. त्यामुळे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलेले नव्हते. मात्र गुरुवारी बढती आणि बदली झालेल्या 17 अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. ”
सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्‍त – मुख्यालय

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)