भोर – भोर तालुक्यातील नसरापूर येथे शनिवारी (दि. 2) रोजी एक करोना बाधित रुग्ण सापडल्याने भोरच्या प्रशासनाने खबदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नसरापूरसह 8 गावांत कंटेन्मेंट तर 10 गावांत बफर झोन जाहीर केला असून या 18 गावांतील 3913 कुटुंबांतील 18हजार 659 लोकांची करोना संदर्भात घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती भोरचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
या साठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांच्या 33 टीमद्वारे ही तपासणी करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन मधील नसरापूर, कामथडी, खडकी, माळेगांव, दिडघर, निधान, सांगवी, वीरवाडी व केतकावणे या 8 गावांची तपासणी आज (दि. 4) पासून सुरु करण्यात आली आहे.
बफर झोनमधील केळावडे, साळावडे, जांभळी, हातवे खुर्द, भिलारे वाडी, उंब्रे, नायगांव, दिवळे, देगांव व करंदी खेडेबारे या 10 गावांची तपासणी युद्ध पातळीवर करण्यात येणार असून या तपासणीचा अहवाल भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांना सादर करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
करोना बाधिताच्या पत्नीलाही लागण
करोनाची बाधा झालेल्या नसरापूर येथील रुग्णाचे संपर्कात आलेल्या 9 लोकांना तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. यामध्ये या रुग्णाच्या पत्नीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर 19 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.