सातारा – रविवारी रात्री ९ नंतर यवतेश्वर, ता. सातारा येथे सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कासकडे जाणाऱ्या ३०० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये सहा मद्यपी चालक आढळून आल्याने त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर अनेक तरुण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडतात. तरुणांचा ओढा हा कासकडे मोठ्या प्रमाणावर असतो. हे लक्षात घेऊन सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सातारा-कास मार्गावर यवतेश्वर नजिक एकूण ३०० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ६ मद्यपी चालक आढळून आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान रविवारी रात्री बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात शहर आणि वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. त्या ठिकाणी कोरेगावहून सातारकडे आणि सातारहून कोरेगावकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत होती.