कराड – लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ऑफलाइन कामाच्या वाटपाबाबत कराड पंचायत समितीतील बैठकीत कामांचा ठेका आम्हालाच मिळाला पाहिजे, यासाठी ठेकेदारांनी गोंधळ घातल्याने वाद हमरीतुमरीवर आला. गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी बैठक बरखास्त करून पोलीस संरक्षण मागवत ठेकेदारांना सभागृहातून बाहेरचा रस्ता दाखवत त्यांच्या दादागिरीला प्रशासकीय इंगा दाखवला.
गावागावांत जलसुविधा, स्मशानभूमी सुधारणा, कॉंक्रिटीकरण व पाणी पुरवठा यासंदर्भातील पाच लाखांच्या आतील कामे वाटपासाठी गुरुवार दि. 2 रोजी बैठक होती. या बैठकीत कामे घेण्यासाठी अनेक ठेकेदारांनी गर्दी केली. यामध्ये काही ठेकेदार मनमानी करत होते. त्यानंतर गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी त्यांना सूचना केल्या. तरीही ठेकेदारांनी गोंधळ थांबवला नाही. त्यामुळे अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय इंगा दाखवत बैठक रद्द करून सर्वांनाच सभागृहाच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले.